Published On : Fri, Oct 12th, 2018

२२ ऑक्टोबरपासून पाणी बिल थकबाकीदारांविरुद्ध मनपाची मोहीम

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करते. त्यामुळे त्यापोटी येणारे बिल भरणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. परंतु पाणी बिलापोटी असलेला थकबाकीचा आकडा वाढला आहे. पाणी बिल थकबाकीदारांनी २१ ऑक्टोबरपर्यंत थकीत पाणी बिल तातडीने अदा करावे. अन्यथा २२ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम चालविण्यात येईल. नागरिकांची नळ जोडणी कापण्यात येईल. वेळ पडली तर संबंधित थकबाकीदाराच्या मालमत्तेचा लिलावही करण्यात येईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कन्हान नदी आणि पेंच प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा असल्याने यापुढे शहराला पाणी पुरवठा कशा प्रकारे करायचा याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी (ता. १२) मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) प्रदीप राजगिरे, श्री. चिटणीस, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये यावर्षी केवळ २८१ द.ल.घ.मी. साठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हा साठा ४८७ द.ल.घ.मी. होता. ही आकडेवारी लक्षात घेता यंदाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाणी कपात करणे, पाणी चोरी थांबविणे, नवे स्त्रोत निर्माण करणे आदी विषयांवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर पाणी बिल थकबाकीदारांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ओसीडब्ल्यूद्वारे २५ हजार रुपयांवर थकबाकी असलेल्या ग्राहकांची झोननिहाय यादी जारी करण्यात आली आहे. ही यादी मोठी आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांना यापूर्वी नोटीस देण्यात आले असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण थकबाकी २१ तारखेपर्यंत भरण्याची मुदत थकबाकीदारांना देण्यात येणार आहे. त्या मुदतीच्या आत थकबाकी अदा केली नाही तर २२ ऑक्टोबरपासून वसुलीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. वसुली न देणाऱ्या ग्राहकांची नळजोडणी त्याच वेळी कापण्यात येईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली. अवैध कनेक्शनची माहिती करून घेण्यासाठी एक योजना तयार करा. माहिती देणाऱ्यांसाठी बक्षिसांचे प्रावधान करा, असे निर्देशही जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिले.

-तर मालमत्तांचा लिलाव
वेळोवेळी नोटीस देऊन, संधी देऊनही पाणी बिलापोटी असलेली थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांच्या मालमत्तांचा लिलाव कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. कर विभाग आणि जलप्रदाय विभागाने मालमत्तांचे इंडेक्स नंबर आणि पाणी ग्राहक क्रमांक जोडले असून त्या आधारावरच ही कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

नळजोडणी कापण्यासाठी विशेष स्क्वॉड
मनपाने आवाहन केल्यानुसार २१ पर्यंत थकबाकी भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान थकबाकीदारांची नळ जोडणी कापण्यात येणार आहे. यासाठी विशेष स्क्वॉड तयार करण्यात आला आहे. जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेट, न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड यांचा समावेश असलेला स्क्वॉडला पोलिस संरक्षणही पुरविण्यात येणार आहे. नळजोडणी कापल्यानंतरही कुणी पाण्याची चोरी करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून लवकरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठकीचेही नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement