- विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव तात्काळ सादर करा
- कामठी 83 उपाययोजना 90.7 लक्ष खर्च
नागपूर : पिण्याच्या पाण्याच्या टंचाई संदर्भात प्रत्येक गावात राबवायच्या उपाययोजना संदर्भात ग्रामसेवकांनी जून पर्यंत राबवायचा आराखडा तात्काळ तयार करुन सादर करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पाणी टंचाई संदर्भात आराखडानुसार कामे होणार नाही. अशा ग्रामसेवकांच्या दोन वेतनवाढी थांबविण्यात येतील. अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी येथे दिल्यात.
कामठी तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात तयार करण्यात आलेल्या आराखडयाच्या अमलबजावणीनुसार प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमती अनिता चिट्टे, उपसभापती देवेंद्र गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्री केदार, जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, श्रीमती कुंदा आमधरे, पंचायत समिती सदस्य विमल साबळे, नरेश शेंडे, मदन राजुरकर, संगिता बेलेकर, श्रावण बागडे, नगरसेविका संध्या रायबोले, प्रतिक बडोले, लालसिंग यादव, संजय कनोडिया, उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री निंबाळकर, तहसिलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी रविंद्र भेलावे, आदि अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
कामठी तालुक्यातील पाणी टंचाई आराखडयानुसार 45 गावांमध्ये 83 विविध उपयोजना सुचविण्यात आल्या असून यावर 90.07 लक्ष खर्च अपेक्षित असून हा आराखडा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरीचे बांधकाम, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, तसेच पाच टँकरद्वारे पाणी पुरवठा आदिंचा समावेश असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भिलगाव, कसाळा, मसाळा, खैरी व कवटा या गावांना नागपूर महानगर पालिकेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहेत, तसेच कन्हान नदीवरुन रनाळा व येरखडयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा कार्यान्वीत करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत गुमथाळा, वडाळा, गुमगाव, आदी गावांना मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून कामे घेण्यात येतील. ज्या गावांमध्ये बोरवेल बंद आहे, तसेच ज्या बोरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य आहे अशा सर्व बोरवेलची यादी तयार करुन त्या यादीतून वगळण्यात यावा. तसेच 50 नवीन बोरवेलचा प्रस्ताव सादर कराव्या अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
पाणी टंचाई आराखडयानुसार भिलगाव, जाखेगाव, आसोली, सावडी, परसोडी व चिखली या सहा गावात खाजगी विंधन विहिर अधिग्रहीत करण्याचे प्रस्तावित असून मसाळा, भिलगाव, बिडगाव आणि तरोडीखुर्द या गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती देतांना पालकमंत्री म्हणाले की, ग्रामसेवकांनी सरपंचांना संमतीने पाणी टंचाई आराखडयानुसार उपाययोजना संदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करावे, त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कामठी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, उन्हाळयामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यादृष्टीने नियोजन करा. प्रभाग 15 मधील दुषित पाण्याच्या संदर्भात तसेच आनंदनगर, रामगड या भागातील जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याच्या संदर्भात मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रारंभी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी कामठी तालुक्यात पिण्याच्या पाणी टंचाई संदर्भात जूनअखेरपर्यंत दोन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरपंचांकडून गावनिहाय पाणी टंचाई संदर्भात राबविण्यात येत असलेल्या आराखडया संदर्भात माहिती घेतली. तसेच अतिरिक्त उपाययोजना संदर्भातही सरपंचांनी बैठकीत सूचना केल्या. गावनिहाय आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, नाला सरळीकरण तसेच पांधन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येणार असून ग्रामसेवकांनी कामांची नियोजन करावे. गावात पूर संरक्षण यंत्र, अन्न् सुरक्षा अभियानाअंतर्गत सुटलेल्या कुटुंबांची यादी, गॅस कनेक्शन नसलेलया कुटुंबधारकांची माहिती, तसेच अंध, अपंग, निराधारांची यादी तात्काळ तयार करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.