कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
नागपूर: पेट्रोल डिझेल या इंधनाचे वाढते दर आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता भविष्यात जलमार्गानेच मालवाहतूक ही परवडणारी असेल आणि या वाहतुकीच्या माध्यमातूनच मालवाहतूक खर्चात बचत शक्य आहे. जलमार्गाने वाहतुकीसाठी लागणारा खर्च हा अन्य सर्व वाहतुकींच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. भारतात आज मालवाहतुकीवर होणारा खर्च अन्य देशांच्या तुलनेत बराच अधिक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे या विषयावर जलमार्ग परिषदेत ना. गडकरी संवाद साधत होते. आभासी पध्दतीने झालेल्या कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा, केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्वांनंद सोनोवाल, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, ना. जी. किशन रेड्डी, भूतानचे मंत्री लोंपो लोकनाथ शर्मा, बांगला देशचे जलवाहतूक मंत्री खालिद मोहम्मद चौधरी, केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक आणि शंतनू ठाकूर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे. त्या अंतर्गतच उत्तरपूर्व भारताच्या विकासाला आणि या भागात पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्यास सरकारचे प्राधान्य आहे. नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेत पर्यटनाचा विकास, जलवाहतूक मार्गांचे जाळे, रस्त्यांचा विकास केला जात आहे. उत्तरपूर्व भारतात विकासाची क्षमता अधिक आहे, असे सांगून ते म्हणाले- उद्योग सुरु झाले की विकास होईल व रोजगारात वाढ होईल. उत्तरपूर्व भारतात पायाभूत सुविधांच्या निर्मितीची खूप संधी आहेत.
आगामी काळात मालवाहतूक क्षमता वाढविणे आहे. त्यातही जलमार्गाने मालवाहतूक वाढविणे ही देशाची गरज आहे. मालवाहतुकीवर होणार्या खर्चात बचत करणे आवश्यक आहे. आसाम या राज्यात तर मिथेनॉल उपलब्ध झाले आहे. जलवाहतुकीचा विकास ही देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मालवाहतुकीप्रमाणेच उत्तरपूर्व भागात पॅसेंजर वाहतूकही जलमार्गाने व्हावी असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सागरमाला परियोजनेअंतर्गत 12 लाख कोटींचे 576 प्रकल्प घेण्यात आले आहेत. 2019 मध्ये 2.5 लाख कोटींचे 199 प्रकल्प सुरु झाले आहेत. 1 लाख कोटींच्या प्रकल्पाचे अवॉर्डस झाले आहेत. यापैकी 14 हजार कोटींचे 69 प्रक़ल्प पूर्ण झाले आहेत. देशात 2 लाख कोटींचे 30 मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क उभारले जात आहेत, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.जलवाहतुकीचा विकास आणि जैविक इंधनाचा सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये वापर हेच भविष्यात गेमचेंजर ठरणार असल्याचेही शेवटी ते म्हणाले.