नागपूर : दिघोरी नाक्याजवळ ‘हिट अँड रन’ची घटना घडली होती. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या ८ जणांना मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला तर लहान बालक जखमी झाला आहे.पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली.
आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.उपचारादरम्यान तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून मृतकांची संख्या तीन झाली आहे. इतर जखमींवर मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहे. हसीना बागडिया (वय-3) असे मृत मुलीचे नाव आहे.
आरोपी चालकासह कारमध्ये सहा विद्यार्थी होते.त्यातील सर्वच जण दारूच्या नशेत वाढदिवस साजरा करून फिरायला निघाले होते. भूषण नरेश लांजेवार (वय -20 रा. दिघोरी) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. राजेंद्र बागडिया (वय-34) यांच्या तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात कांतीबाई गजोड बागडिया (वय- 42) आणि सीताराम बाबूलाल बागडिया (वय-30 दोघे रा. करवर, अरियाली, जि. बुंदी, राजस्थान) यांचा मृत्यू झाला आहे. तर कविता बागडिया (वय-28), बुलको बागडिया (वय-8), सकीना बागडिया (वय- दीड वर्ष), हनुमान बागडिया (वय-35), विक्रम ऊर्फ भूषा (वय-10) आणि पानबाई (वय- 15) अशी जखमींची नावे आहेत. मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी हसीना आणि सकीना यांची प्रकृती चिंताजनक आहे.