नागपूर : मुलांनो प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठी संधी दडलेली असते. आपल्याला चांगले व्हायचे आहे, चांगलेच कार्य करायचे आहे अशी मनात खुणगाठ बांधा. मोठी स्वप्न पहा. आपणही एक दिवस चांगला व्यक्ती होऊ हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्याला प्रयत्नांची जोड द्या. तुमच्या मधून पोलीस अधिकारी व्हावेत अशी आमची इच्छा असून त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी केले. महिला व बालविकास विभाग अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे आयोजित चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुऱ्हे, आर्यनमॅन दक्ष खंते आदी उपस्थित होते.
इतर मुलांपेक्षा वेगळी आव्हाने तुमच्या समोर आहेत. यावर तुम्ही यशस्वी मात करुन तुमच्यातील कलागुणांची चुणूक सिध्द करुन दाखविली आहे. चांगली खिलाडूवृत्ती तुम्ही बाळगली आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर अनुरक्षण गृहातील तुमच्या वास्तव्याला कृतीची जोड द्या. तुमची ओळख चांगले खेळाडू म्हणून व्हावी. तुमच्यापैकी चांगले पोलीस अधिकारी व्हावेत यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्वप्रशिक्षणाच्या सुविधा तुम्हाला येथे उपलब्ध आहेत. या मुख्यालयातील ग्राऊंडवर तुम्हाला सरावासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करु, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी सांगितले.
विपरित परिस्थितीतून मात करीत तुम्ही स्वत:ला सिध्द करण्याची मनीषा व आत्मविश्वास बाळगला आहे. सजग समाजात कोणतीही मुले अनाथ असत नाहीत. तुम्हच्या विकासाची, शिक्षणाची जबाबदारी व पालकत्व शासनाने, महिला व बालविकास विभागाने स्वीकारलेले आहे. समाजातील विविध घटकांनी, सेवाभावी संस्थांनी आपल्यासाठी मदतीचा हात पुढे ठेवला असून मदतीचे हे हात समाजातून आणखी वाढतील असे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुऱ्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात एकूण 350 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही सर्व मुले व मुली शासकी बालगृह, स्वयंसेवी संस्थांचे बालगृह त्याचप्रमाणे महिला वसतिगृहातील लाभार्थी सहभागी आहेत. यात धावणे, खो-खो, कबड्डी, लांब उडी, गोळाफेक व व्हॉलीबाल क्रीडा स्पर्धांसह कॅरम,चेस, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.