नागपूर : नागपूर महानगरासह लगतच्या हुडकेश्वर – नरसाळा भागामध्ये मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या निर्माण झाल्या. यासाठी पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करणे आवश्यक होते. रस्ते आवश्यक होते. नवीन विकसीत झालेल्या अधिवास क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे गरजेचे होते. मुख्यमंत्री असताना सर्व प्रथम प्राधान्याने येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. नरसाळा हुडकेश्वर या भागातील जनतेसाठी तेव्हा दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनामुळे विकासकामांना आता नियोजनबद्द गती देता आली. याच कामांतून हुडकेश्वर-नरसाळा भागातील पायाभूत सुविधा भक्क करू, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अमृत-2 योजना अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रातील हुडकेश्वर-नरसाळा भागातील केन्द्र शासन अमृत योजना 2.0 अंतर्गतमधे पॅकेज 5 मधे समाविष्ट 115 कोटी 46 लाख रुपयांच्या मलनि:सारण प्रकल्पाच्या आणि या भागातील अंदाजित 35 कोटीच्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन सभारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, माजी आमदार सुधाकर कोहळे, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर उपस्थित होते.
हुडकेश्वर, नरसाळा परिसरातील गटरलाईन व मल नि:सारण प्रकल्प हे आवश्यक होते. मल नि:सारण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय स्वच्छतेमुळे आरोग्य व इतर प्रश्न सुटणार आहेत. आपल्या भागातून जाणारी पोहरा नदी ही प्रकल्प नसल्याने नाल्यात रुपांतरीत झाली आहे. या नदीलाही आता प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्वच्छतेचे रुप प्राप्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी पुढाकार व पाठपुरावा केल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
वास्तविक या व इतर प्रकल्पासाठी मधल्या काळात कसलाही निधी मिळाला नाही. याची कमतरता आपले शासन आल्यानंतर आपण आता भरुन काढत कामांना गती दिली आहे. या प्रकल्पांना निधीही उपलब्ध करुन दिला आहे, असे ते म्हणाले. सर्वसामान्य समाजातील घटकाला, माणसांना केंद्रस्थानी ठेऊन आपण योजना आखल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांनी विविध विकास कामांचा आढावा मांडला. नरसाळा येथील आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. याप्रसंगी मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधिक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, डॉ श्वेता बॅनर्जी, माजी नगरसेवक भगवान मेंढे, स्वाती अखतकर, वीणा मडावी आणि लीला हाथीबेड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष सोनी यांनी केले आणि आभार ही मानले.
प्रकल्पाबद्दल माहिती
– केंद्र शासन पुरस्कृत अमृत-2.0 योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिके करीता नागपूर शहरातील साऊथ सिवरेज झोन व हुडकेश्वर आणि नरसाळा करीता सांडपाणी संकलन प्रणालीचा विकास करणे व प्रक्रिया बाबतचा “पोहरा नदी प्रदूषण निर्मुलन प्रकल्पाचा (Pollution Abatement of Pohra River Project)” समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान 25%, राज्यशासन अनुज्ञेय अनुदान 25% महानगरपालिकेस प्राप्त होणार आहे आणि नागपूर महानगरपालिकेचा हिस्सा 50% आहे. या प्रकल्पासाठी रु. 957.01 कोटीस (GST सह) खर्चाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
– सदरील प्रकल्पांतर्गत हुडकेश्वर-नरसाळा करीता सांडपाणी संकलन प्रणालीचा विकास करण्याबाबत पॅकेज 5 अंतर्गत कामे प्रस्तावित आहे.
– पॅकेज क्र. 5 अंतर्गत नरसाळा-हुडकेश्वर या भागात सिवर लाईनची कामे अंतर्भुत असून प्रशासकीय मंजूर राशी रु. 155,46,52,472/- इतकी आहे.
– या प्रकल्पातील पॅकेज क्र. 5 अंतर्गत नरसाळा-हुडकेश्वर भागातील विविध वस्त्यांमध्ये जुन्या खराब सिवर लाईन बदलविणे व नविन प्रस्तावित सिवर लाईन टाकणे यात 200 मि.मी. ते 1000 मि.मी. व्यासाचे असे एकूण 164.9 कि.मी. लांबीच्या सिवरेज लाईनचे नेटवर्क टाकण्यात येणार आहे.
– सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षाचा आहे.
– या प्रकल्पामुळे नागपूरातील दक्षिण सिवरेज झोन अंतर्गत हुडकेश्वर-नरसाळा मधील संपूर्ण परिसरात सिवरेज नेटवर्क तयार झाल्याने नागरीकांना दिलासा मिळेल व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील.
– या प्रकल्पाअंतर्गत मुख्य सिवर ट्रंक लाईन या सांडपाणी प्रक्रिया केंद्रास जोडण्यात येणार असल्यामुळे यापूर्वी पोहरा नदीमध्ये होणारे प्रदूषण निर्मुलन करता येईल.