– सुरेश राठी यांची ‘व्हीआयए’च्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती
नागपूर: विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी यांची विदर्भाची औद्योगिक भरभराट होण्यासाठी विदेशी कंपन्यांचे प्लांट विदर्भाच्या धरतीवर सुरू करण्यासाठी आपण केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे नागपूर टूडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांची अलीकडेच ‘व्हीआयए’च्या अध्यक्षपदासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने नागपूर टूडेशी केलेल्या चर्चेत त्यांनी विदर्भ विकासाचा प्लान मांडला.
ते म्हणाले की, सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. मागील 2 महिन्याच्या लाॅकडाउनच्या काळात बरेच परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी गेले. अशा स्थितीत हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर आणि विदर्भातील अन्य एमआयडीसी भागातील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. सध्याच्या घडीला नागपूर क्षेत्रातील एमआयडीसी भागातील 95 टक्के कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी कारखानदारांनीही मजुरांना पुन्हा कामावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्यातील कारखान्यांमध्ये 75 टक्के भूमिपुत्रांना कामगार म्हणून रोजगार दिला जाण्याचे धोरण कारखानदारांनी स्वीकारले आहे. यामुळे कुशल कामगारांना आणि कौशल्य अंगी असलेल्या युवकांना रोजगाराची मोठी संधी विदर्भातच उपलब्ध होणार आहे. विदर्भभूमीत पुणे, मुंबई आणि बंगलोरप्रमाणे औद्योगिक हब बनावे यासाठी विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनची संपूर्ण चमू कामाला लागली आहे. विदर्भात कोळसा, वीज, जमीन, पाणी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या बाबी विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. सरकारने आम्हाला साथ दिली तर नैसर्गिक संसाधनाच्या आणि तंत्रज्ञानाच्या बळावर आम्ही विदेशी कंपन्यांना विदर्भातून उद्योग सुरू करण्यासाठी मदत करू शकतो. असे झाल्यास स्थानिक बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल.