नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली.
भाजप -शिवसेना युती काळात आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आम्हीही प्रचार केला होता. तेव्हा आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.शिवसैनिक ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. शिवसैनिक मला वारसा हक्कानं मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आम्हीही प्रचार केला होता. तेव्हा आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो का? असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
“मुंबईत दंगली पेटल्यावर शिवसैनिकांनी गावागावांमध्ये हिंदुंचं रक्षण केले होते. आम्ही तेव्हा तू भाजपचा आणि मी शिवसेनेचा असे केले नाही. भाजपकडून वारंवार विरोधकांवर ईडीचा धाक दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आम्ही याला घाबरणार नाही. नुकतेच राजन साळवींचे कुटुंब भेटले , वाकणार नाही म्हणाले. खासदार संजय राऊत तुरुंगात जाऊन आले आहेत. अचानक तुम्हाला सगळे भ्रष्ट वाटायला लागले. तुमच्या भ्रष्टाचाऱ्याचे पाढे आम्ही वाचतो आहे, त्याच्या चौकशा लावा. आम्ही लावणार आणि तुम्हाला तुरूंगात टाकणारच आहोत, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.