नागपूर : पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नागपूर पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. नायलॉन मांजावर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल म्हणाले की, येत्या दिवसांत ड्रोन कॅमेरे पतंग उडवणाऱ्या किंवा नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर लक्ष ठेवतील. या कामासाठी पोलीस विभाग पाच ड्रोन तैनात करण्याची योजना आखत आहे. तसेच यादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असली तरी काही लोक ते गुप्तपणे विकत आहेत. त्याच्या घातक परिणामांमुळे पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली. विविध ठिकाणी छापेमारी टाकण्यात येत असून मांजा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक विक्रेत्यांना अटक करण्यात आली असली तरी, मुख्य पुरवठादार अद्यापही फरार आहेत. जुनी शुक्रवारी, नवी शुक्रवारी आणि इतवारी सारखे क्षेत्र नायलॉन मांजाच्या विक्रीचे केंद्र मानले जातात.
मकर संक्रांत जवळ येत असल्याने पोलिसांनी त्यानुषंगाने तयारी सुरु केली आहे.पोलीस आयुक्त सिंगल यांच्या मते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या किंवा नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील. नायलॉन मांजासह छतावरील पतंग उडवण्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाच ड्रोन तैनात केले जातील. याव्यतिरिक्त, पोलिस स्टेशन पातळीवर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच उत्सवादरम्यान काही उड्डाणपुलांवर वाहतूक निर्बंध घालण्याचे नियोजन केले जात आहे.