नागपूर : भाजपने सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन या कवितेचा व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली. यानंतर भाजपने तो व्हिडीओ डिलीट केला. त्यानंतर काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या घडामोडीवर फडणवीस यांनी यांनी भाष्य केले.
एखाद्याला यायचे असेल तर तो काही व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.