मुंबई : अवघ्या काही तासांनंतरच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ ला बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा वाद पेटला.
हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. या प्रकरणी न्यायलयात ९ महिने सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला. आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल लागण्यापूर्वीच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपने आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. भाजपा आणि शिवसेना युती मिळून आम्ही या निवडणुका लढवू. आम्ही २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू असाही विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही आला तरीही सरकार स्थिर असेल असाही दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल आज लागणार आहे, याबाबत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काल संकेत दिले. यापार्श्वभूमीवर हा निकाल नेमका कोणत्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.