मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरु झाली होती.लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये कधी येणार ? असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिले.
निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. देशभरात अनेक सरकारनी या योजनेचं अनुकरण केलं. लाडकी बहीण या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला. ज्या विरोधकांनी खोडा घातला त्या सावत्र भावांना बहिणींनी चांगला जोडा दाखवला. तरीही विरोधकांमध्ये सुधारणा होत नाही. आमच्यावर आरोप सुरुच आहेत.
आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणी सावत्र झाल्या, त्यांचे 2100 रुपये कधी देणार, योजनेतून बहिणींची नावे का वगळता, असे आरोप आमच्यावर विरोधकांकडून सुरु आहेत. मात्र आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलले नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, एवढी खात्री बाळगा, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेसाठी योग्य ती आर्थिक तजवीज करुन ही योजना राबवली जात आहे. आता 1500 रुपयांची ओवाळणी 2100 रुपये कशी आणि कधी करायची याची आखणी शिस्तबद्ध पद्धतीने करत आहोत. आमचे सरकार प्रिटिंग मिस्टेकवाले नाही. आम्ही बोललो ते करणार. काटकसर करुन जे करायचे ते करु. आपल्या सगळ्या योजना सुरु ठेवायच्या आहे, विकासकामे करायची आहेत सगळे करत असताना जे बोललो ते करायचे आहे, असेही शिंदे म्हणाले.