Published On : Thu, Mar 22nd, 2018

शिक्षक भरती केव्हा करणार? : विखे पाटील

Vikhe Patil
मुंबई: मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न रखडला असून, डी.एड., बी.एड. केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी शिक्षक भरतीच्या प्रश्नाला वाचा फोडली. ते म्हणाले की, रोजगाराची हमी देणाऱ्या राज्य सरकारने डीएड, बीएड झालेल्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मागील अनेक महिन्यांपासून शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार केवळ पोकळ आश्वासने देऊन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची दिशाभूल करते आहे. गेल्या १० फेब्रुवारीला शिक्षण मंत्र्यांनी पुढील सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा मोठ्या दिमाखात केली. खरे तर या शिक्षक भरतीसाठी पूर्वपरीक्षा केव्हाच झाली आहे. सरकारला फक्त त्याचा निकाल जाहीर करायचा आहे आणि भरती करायची आहे.

त्यामुळे सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल आणि आपल्या घोषणेप्रती ते प्रामाणिक असतील तर २४ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी सहा महिने थांबण्याची देखील गरज नाही. सरकारने ठरवले असते तर आतापर्यंत निकाल जाहीर होऊन पुढील प्रक्रिया देखील सुरू झाली असती. पण शिक्षण मंत्र्यांच्या १० फेब्रुवारीच्या घोषणेला आता दीड महिना होत आला असतानाही शिक्षण विभाग ढिम्मच आहे. स्वतःच्या घोषणेची आपल्या विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याचे शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास येत नाही का? की ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने हे अधिवेशन संपण्याच्या आत पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करावा आणि पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डीएड, बीएड केलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करावा लागतो आहे. त्यांच्या आयुष्यातील उमेदीचे दिवस असेच वाया गेले तर सरकारलाच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांनाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. अधिवेशन सुरू होताना काही मुले मला भेटायला आली होती. त्यातील एका मुलीने पोटतिडकीने सांगितले की, “आमच्या आई-वडिलांनी परिस्थिती नसतानाही एक गुंतवणूक म्हणून आमच्या शिक्षणाचा आर्थिक बोजा सहन केला. शिक्षक झालो तर आमचे लग्न लवकर होईल, नोकरीला असल्याने मुलगाही चांगला मिळेल, कदाचित हुंडा द्यावा लागणार नाही, अशी त्यांची कल्पना होती. परंतु, डीएड, बीएड करून आम्ही बेकार असल्यामुळे त्यांची हिंमतच खचली आहे.”, असे त्या मुलीने सांगितल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

शिक्षक भरतीची पूर्वपरीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये साधारणतः ६० टक्के मुली आहेत. त्यामुळे या मुलीने मांडलेली व्यथा पाहता हा प्रश्न केवळ रोजगारापुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याला अनेक सामाजिक संदर्भ देखील आहेत. गरीब घरातील मुलांचीही तीच अडचण आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही अनेक पालकांनी उद्या मुलगा शिक्षक झाला तर घराचे भले होईल, या आशेने आपल्या मुलांना शिकवले. ते देखील आता नैराश्याने ग्रासू लागले आहे, याकडे विखे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सरकारने शिक्षक भरती न केल्यास आम्हालाही आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

Advertisement