मुंबई: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
या भेटीत त्यांची कोणती फाईल उघडली, ज्यामुळे त्यांच्या नवनिर्माण पक्षाचे नमोनिर्माण झाले, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. याची उत्तरे त्यांनी दिली पाहीजेत, असेही राऊत म्हणाले.
तुम्हाला अचानक महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला. तुमचा नमोनिर्माण पक्ष कसा झाला? नमोनिर्माण होण्याची गरज का पडली? अशा प्रश्नांची सरबत्ती राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.