Published On : Thu, Jun 20th, 2024

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमधून कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? कृष्णा खोपडेंसह समीर मेघेंच्या नावांची चर्चा

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुती सरकारचे रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात नागपूर जिल्ह्यातून कुठल्या आमदारांला संधी मिळणार,हे पाहावे लागणार आहे. मंत्रिमंडळात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची नावे सध्या जोरदार आघाडीवर असून यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

आमदार कृष्णा खोपडे पूर्व नागपूरमधून तिसऱ्यांदा निवडूण आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे नाव सातत्याने चर्चेत येत होते. मात्र स्वतः फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असे जिल्ह्यातील दोन वजनदार नेते मंत्रिमंडळात असल्याने खोपडे यांना त्यावेळी संधी मिळाली नाही. मात्र आता त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तर दुसरीकडे हिंगणा मतदारसंघात मेघेंच्या पराभवासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. हे बघता मेघे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचे हात बळकट केले जाऊ शकतात.

दरम्यान विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजायला आता केवळ 4 महिन्यांचा कालावधी उरला आहे, असे असताना राज्य सरकारकडून नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला खूश करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.