नागपूर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी ही आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे. आज सायंकाळी ममता महाकुंभाच्या संगमावर पिंडदान करणार आहे. सायंकाळी सहा वाजता तिचा पट्टाभिषेक कार्यक्रम होईल. ममताने यापूर्वी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अम्बानंद गिरी यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यानंतर सर्व स्तरावर विविध चर्चा रंगल्या आहेत.
तब्बल २४ वर्षानंतर परतली भारतात –
अभिनेत्री ममता कुलकर्णी २४ वर्षांनी भारतात परतली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ही अभिनेत्री मुंबई विमानतळावर दिसली. इतक्या वर्षांनी तिला भारतात पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी किंवा बिग बॉस १८ मध्ये प्रवेश करण्यासाठी भारतात आल्याचे मानले जात होते. तथापि, अभिनेत्रीने या सर्व अफवा आणि अटकळांना फेटाळून लावत म्हटले की ती महाकुंभ २०२५ चा भाग बनली आहे.
ममातेने २००० मध्ये सोडले होते भारत –
ममता कुलकर्णीने सण २००० मध्ये भारताचा निरोप घेतला. पुन्हा भारतात परतल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. भारतीय भूमीवर पाऊल ठेवल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. अभिनेत्री म्हणाली होती, ‘सर्वांना नमस्कार, मी ममता कुलकर्णी आहे आणि मी २५ वर्षांनी भारतात मुंबईला, आमची मुंबईला परतली आहे.’ मी २००० मध्ये भारत सोडला आणि २०२४ मध्ये परतले . मी इथे आहे आणि मी खूप भावनिक होत असून कसे व्यक्त व्हावे मला समजत नाही. भारतात दाखल होताच विमानातून उतरताना मी माझ्या उजवीकडे आणि डावीकडे पाहू लागले. मी २४ वर्षांनंतर माझा देश पाहत होतो आणि मी भावनिक झाले. माझ्या डोळ्यात अश्रू होते.ममता कुलकर्णी ‘करण अर्जुन’, ‘छुपा रुस्तम’, ‘बाजी’ आणि इतर चित्रपटांसाठी ओळखली जातात.
ड्रग्ज प्रकरणात आले होते ममताचे नाव –
२०१६ मध्ये, एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीचे नाव समोर आले. ड्रग्ज प्रकरणात दुबई तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विकी गोस्वामीसोबतही ममता कुलकर्णीचे नाव जोडले गेले होते. भारतात परतल्यानंतर, अभिनेत्रीने या नात्याला नकार दिला आहे. ती म्हणते की ती अध्यात्माच्या मार्गावर चालत आहे.
ममता कुलकर्णी ही साधवीच्या वेषात किन्नर आखाड्यात- भारतात दाखल होताच ममता कुलकर्णी ही साधवीच्या वेषात किन्नर आखाड्यात दिसली होती. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बांधले जात असून, त्यात पट्टाभिषेक केल्यानंतर ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात येणार आहे. त्यापूर्वी ममताने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटोही व्हायरल झाले. विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने तिच्या नावातही बदल केला असून ती आता ‘श्री यामाई ममता नंद गिरि’ या नावाने ओळखली जाणार आहे.
भारत सोडण्याचे कारण काय ?
मी भारत सोडण्याचे कारण म्हणजे अध्यात्म. 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्यादरम्यान माझी भेट गुरू गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली आणि त्यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली, असे ममताने सांगितले होते. ममता कुलकर्णीचे विकी गोस्वामीशी लग्न झाल्याबद्दलच्या चर्चा होत्या. मी कोणाशीही लग्न केलेले नाही कारण मला त्यासाठी वेळ मिळाला नाही, असेही तिने स्पष्ट केले होते. तसेच छोटा राजनसोबतही माझे नाव जबरदस्तीने जोडले गेल्याचे तिने स्पष्ट केले होते.