नागपूर : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले.
या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. आता खातेवाटपानंतर अनेक मंत्र्यांची पालकमंत्रिपदासाठी सरकारमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. यातच नागपूरचा पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. नागपूरचा पालकमंत्री घोषित झाला नसला तरी तो जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती आहे. राज्याचे नवे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात दोनच कॅबिनेट मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचाच हक्क नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहणार आहे. फडणवीस यापूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्री असताना पालकमंत्री बावनकुळे हेच होते. तेव्हा त्यांच्याकडे ऊर्जा खाते होते.
ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरसह भंडारा आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. विधानसभेची निवडणूकसुद्धा त्यांच्याच नेतृत्वात घेण्यात आली आहे. त्या निवडणुकीत भाजपसह महायुतीला बंपर यश मिळाले आहे. ते प्रदेशाध्यक्ष असतानाही पहिल्याच विस्तारात त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे महसूल खाते त्यांना देण्यात आले आहे.
येत्या आगामी तीन महिन्यांत नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदसुद्धा भाजपला पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायची आहे. याशिवाय बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची त्यांची जागा रिकामी झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडीत बावनकुळे आणि पालकमंत्री यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.