मुंबई : शिवसेना पक्षनेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसोमोर येणार आहे. शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना विधीमंडळ आज नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे .
महाराष्ट्रात सत्तांतर होऊन वर्ष लोटले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्यापही प्रत्यक्षात समोरासमोर आलेले नाहीत. ते समोरासमोर आल्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरावे सादर करताना शिंदे आणि ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. जुलै 2022 मध्ये नेमकी शिवसेनेची सुत्रे कोणाच्या हातात होती? हे तपासले जाणार आहे.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहे.
25 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती.या सर्व गोष्टींचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सर्व आमदारांना हे वेळापत्रक सकाळी पाठवण्यात आले आहे. हे पाहता कदाचित उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.