मुंबई : प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोपी विरोधी पक्षाकडून सातत्याने करण्यात येतो.
आता शिंदे आणि भाजप सरकारसोबत सत्तेत सहभागी असलेले आमदार बच्चू कडू यांनी यांनीही या मुद्द्यावर भाष्य करत भाजपाला सवाल विचारला आहे. भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून का चौकशी केली जात नाही? याचे उत्तर भाजपाने द्यायला हवे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. ते मुंबईत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.
मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर कडू यांनी आपले मत व्यक्त केले. मी भाजपबरोबर सत्तेत आहे. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण आता सत्तेत आल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे, असा आरोपही कडू यांनी केला.