मुंबई : राज्यात पावसाळी अधिवशेन सुरु होऊन आठवडा पूर्ण होणार आहे. अधिवेशनाचे सत्र सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. मात्र अद्यापही विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाही. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
शिवसेना, राष्ट्र्रवादीप्रमाणे आता काँग्रेसमध्येही भीतीचे वातावरण आहे. . कोण कुठे जाईल असा त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. विरोधी पक्षामध्ये एकी दिसत नाही. वर्षभरात किती नेते काँग्रेसमध्ये राहातात आणि किती जण पक्ष सोडतात असं त्यांना संशय आहे.त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीला विलंब होत असल्याचा घणाघात बावनकुळे यांनी केला.
इर्शालवाडीमध्ये दरड कोसळून जी दुर्घटना झाली, यावरही बावनकुळे यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री रस्त्यावर आहेत, घटनास्थळी आहेत. काँग्रेसने राज्यातील अनेक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. घटना घडली तिथे काँग्रेस पक्षाचा एकही नेता गेला नसल्याचे बावनकुळे म्हणाले.