नागपूर – आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दररोज जवळपास ५० रूग्णांवर मोफत उपचार केले जात असून, हा विषय जनहिताशी थेट संबंधित असतानाही माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण स्वरूपात देण्यात आल्याचा आरोप नागपूरचे नागरिक संजय अग्रवाल यांनी केला आहे.
अर्ज क्रमांक PUBHD/R/2025/60562 अंतर्गत अग्रवाल यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत झालेल्या लाभार्थ्यांच्या तपशीलासह चार महत्वाच्या मुद्द्यांवर माहिती मागितली होती. परंतु त्यांना केवळ एका मुद्द्याची अपूर्ण माहिती मिळाली.
मागितलेली माहिती पुढीलप्रमाणे होती:
सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये या कालावधीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या (स्वतंत्र आकडेवारी).
नागपूर जिल्ह्यातील रुग्णांवर खर्च झालेली एकूण रक्कम.
खाजगी रुग्णालयांचा सरकारकडे असलेला थकबाकी रकमेचा तपशील.
ज्या रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत उपचारास नकार दिला अशा संस्थांची यादी व त्यांच्यावर सरकारने घेतलेली कारवाई.
परंतु यातील केवळ एका मुद्द्याची माहिती देऊन इतर बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात संजय अग्रवाल यांनी शासनावर टीका करताना म्हटलं आहे की, संपूर्ण माहिती देण्याऐवजी अपूर्ण माहिती देऊन अर्जदाराला अपील करण्यासाठी भाग पाडले जात आहे. ही लोकांचा वेळ व पैसा वाया घालवणारी प्रक्रिया आहे.
महत्वाचं म्हणजे, प्राप्त माहितीनुसार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात दिनांक १एप्रिल ऑगस्ट २०२४ पासून ते आजपर्यंत ६९११ रुग्णांवर उपचार झाले असून, तर खाजगी रुग्णालयात १२१२६ रुग्णांवर उपचार झाले.दररोज सुमारे ५० रुग्णांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
संजय अग्रवाल यांनी संबंधित खात्याला ई-मेलद्वारे संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, हा विषय जनतेच्या हक्काशी संबंधित असल्यामुळे सरकारने पारदर्शकता पाळावी, अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.