मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये नाराजी पसरली. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी भाष्य करत फडणवीस यांना टोला लगावला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रातील भाजपाच्या मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली. तसेच आजकाल फडणवीसपेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची चर्चा जास्त असल्याचा टोलाही कन्हैया कुमार यांनी लगावला.
फडणवीसांपेक्षा अमृता जास्त चर्चेत-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेत कन्हैया कुमार म्हणाला की, भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांची अवस्था अडवाणींसारखी झाली आहे. 105 आमदार असतानाही 40 आमदारांसह अन्य पक्षाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद भूषवावे लागले. फडणवीसांवर ताशेरे ओढत कन्हैया म्हणाला की, आजकाल देवेंद्रच्या व्हिडीओपेक्षा पत्नी अमृता फडणवीस यांचे व्हिडीओ जास्त व्हायरल होतात. त्यामुळे देवेंद्रपेक्षा अमृता फडणवीस यांची चर्चा जास्त आहे.
भाजप पुढाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केला-
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’ असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपामध्ये येताच अचानक पवित्र होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ड्रग्जचे साठे अदाणींच्याच बंदरात कसे सापडले ?
देशातील युवापिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे.ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांना भोवतालचं भानच राहत नाही. त्यामुळे हे ड्रग्ज तरुणाईला खाईत लोटण्याचं काम करत आहेत. त्यांना घर, कुटुंब, समाज, देश याची कसलीच शुद्ध राहत नाही, असं कन्हैय्या कुमार म्हणाले. त्याचसोबत ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदाणी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.