नागपूर: समाजाचे प्रबोधन करणाऱ्या, समाजाला नवी दिशा देणाऱ्या, वाईट चालीरितीवर प्रहार करणाऱ्या तुकाराम महाराजांची गाथा काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी संपवण्याचे काम त्याकाळी केले होते. चांगली शक्ती काम करीत असताना वाईट शक्ती पण समाजात काम करीत असते. पण संत जगनाडे महाराजांनी तुकारामांची संपूर्ण गाथा त्यांच्या तल्लखबुद्धीने स्मरण करुन लिहून काढली. त्यांनी समाजाला दिलेली ही मोठीच देणगी आहे. अशा समाज संतांचे उत्कृष्ट स्मारक करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जगनाडे चौक येथे आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरण सोहळा कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार,खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री जोगेंद्र कवाडे, कृष्णाजी खोपडे, सुधाकर कोहळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाबूलाल वंजारी, स्मारक समितीचे अध्यक्ष बन्सीलाल चौधरी उपस्थित होते.
समाजाला दिशा दाखविण्याचे काम करणारे संत हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असतात. त्यांचे विचार समाजाला कायम योग्य मार्ग दाखवत असतात. अशा संतांचे चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी, यासाठी शासनाने जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी जागा दिली. ही जागा खुल्या प्रकारात मोडत असल्यामुळे तिथे चटई क्षेत्र लागू होत नाही. पण जगनाडे महाराजानी समाजासाठी काय केले, याची जाणीव समाजाला व्हावी म्हणून स्मारकाच्या ठिकाणीच आर्ट गॅलरी होण्यासाठी नियमात काही बदल करावे लागतील ते निश्चितपणे करण्यात येतील, असेही ते म्हणाले. याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांनी आमदार कृष्णाजी खोपडे यांच्यावर सोपवली.
स्मारकासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली. या स्मारकाचे बांधकाम करताना तिथे पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज आहे, याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
इतर मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासाठीचा कायदा लोकसभेत ठेवला. लोकसभेत हा कायदा पारित झाला असून राज्यसभेत पारित झाल्यावर इतर मागास वर्ग आयोगाला लवकरच घटनात्मक दर्जा प्राप्त होईल. इतर मागास वर्ग समाजाचा सुपुत्रच या देशाचा प्रधानमंत्री असल्यामुळे ओ बी सी समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी मन, माणूस आणि माणुसकी जागृत ठेवण्याची शिकवण देणाऱ्या जगनाडे महाराजाचे स्मारकात आर्ट गॅलरी होण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी चटई क्षेत्र वाढवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कृष्णाजी खोपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. जगनाडे स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांचा स्मारक समितीच्या सदस्यांनी जाहीर सत्कारही केला.
या कार्यक्रमाला हरीश गोरडे, हरीश डीकोंडवार, यशवंत खोब्रागडे, सविता चकोले, दिव्या गोरडे, उमेश साहू, डॉ. रवींद्र भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.