मुंबई: कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. आलेल्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत त्यांची संख्या सरकारने येत्या १ ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. तसेच सरकारने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १ ऑक्टोबर पूर्वी पैसे जमा करावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सरकारला दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक ही उपस्थित होते.
याबाबत विस्तृत बोलताना तटकरे म्हणाले की हे सरकार पूर्णतः सत्तेत मशगूल झाले असून सरकारचे ना मुंबईकडे लक्ष आहे, ना अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडे, ना राज्यातील गणेश भक्तांकडे… या सरकारने घोषणा तर भरसाठ केल्या मात्र कृतीमध्ये कोणतीच गोष्ट आणली नाही. मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती केली जाईल अशी माहिती कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. सरकारने गणेशभक्तांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोप तटकरे यांनी केला.
मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुंबई महानगरपालिका आपली कामगिरी बजावण्यात पूर्णपणे फोल ठरली आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अमरापूरकर यांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारने याप्रकाराची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रिय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलताना तटकरे म्हणाले की एनडीएचा घटकपक्ष असलेली शिवसेना म्हणत आहे की एनडीए मृत पावली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आता उद्धव ठाकरे संजय रुपी हनुमानाला संजीवनी आणायला पाठवणार की काय असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मरगळ झटकणार – तटकरे
संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील २५० विधानसभा मतदारसंघांत निरीक्षक नेमणार आहे. प्रत्येक निरीक्षक आपल्या मतदारसंघात बूथस्तरावर काम करणार असून त्याचा अहवाल थेट प्रदेश कार्यालयाला देतील. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह मुंबईकडे स्वतंत्रपणे लक्ष दिले जाणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
सप्टेंबरच्या अखेर विदर्भात चौथा मंथन दौरा
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संघटन मजबूत करण्यासाठी मंथन दौऱ्याचा चौथा टप्पा विदर्भात दोन दौऱ्यात पूर्ण केला जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नव्या प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्यकरणीची राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.