नागपूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना दहशतवादी संघटनेकडून जीव घेण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
आयएसआयएस काश्मीर या संघटनेने ईमेलद्वारे गंभीर यांना धमकी दिली असून, “I KILL YOU” असा मजकूर त्या ई-मेलमध्ये होता. हा ई-मेल २२ एप्रिल रोजी गौतम गंभीर यांना प्राप्त झाला आहे. ईमेल मिळताच गंभीर यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली असून, त्यांनी एफआयआर नोंदवण्याची मागणीही केली आहे.
गौतम गंभीर यांनी याआधी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती आणि हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल असे स्पष्टपणे नमूद केले होते. ‘भारत शांत बसणार नाही, उत्तर दिलं जाईल,’असेही त्यांनी स्पष्ट केले होते.सध्या सुरक्षा यंत्रणा या धमकीची गांभीर्याने दखल घेत तपास सुरु करत आहेत.