मुंबई : शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री व नेतेमंडळींनी सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांनी पवारांना केली. मात्र या आवाहनावर पवार यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. उलट त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे सर्व मंत्री व काही वरिष्ठ नेत्यांनी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्रात दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. पाया पडून पवारांचे आशीर्वाद घेतले आणि झाल्या प्रकाराबद्दल या सर्व नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पक्ष एकसंध ठेवून अधिक मजबूत करण्याकरिता आशीर्वाद देण्याची विनंती पटेल यांनी केली. जो प्रकार घडला त्यातून मार्ग काढण्याची विनंतीही सर्व नेत्यांनी केली. भेटीस आलेल्या सर्व बंडखोर नेत्यांना पवारांनी चहा पाजला. मात्र यादरम्यान बंडखोर नेत्यांच्या कोणत्याच मागणीला पवारांनी प्रतिसाद दिला नाही.