नागपूर : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे सरकारविरोधात मोट बांधली आहे. या अनुषंगाने आघाडीतर्फे उद्या नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचे विचारवंत व्ही.डी. सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस विशेषतः राज्यात बॅकफूटवर सापडली आहे. शिवसेना आणि भाजपने काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्याभर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यामुळे ‘वज्रमुठ’ रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. परंतु महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा अडचणीत सापडला आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे.
सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे विधान शिवानी वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महाविकास आघडीच्या ‘वज्रमुठ’ रॅलीच्या माध्यमातून सावरकराचा मुद्दा पेटणार असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीची पहिली वज्रमुठ रॅली छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिलला आयोजित कारण्यात आली होती तर आता 16 एप्रिल रोजी होणार्या दुसऱ्या रॅलीला राजकीय महत्त्व आहे कारण नागपूर भाजप बालेकिल्ला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ केंद्र आहे. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे विरोधी पक्ष नेते अजित पवार राजकीय कृतीतून अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या होत्या. ज्यामुळे ते भाजपशी हातमिळवणी करत असल्याची भीती निर्माण झाली होती. नंतर जाहीरपणे, अजित पवार यांनी अफवांचे खंडन केले आणि असा दावा केला की त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे फोन बंद केला होता. त्यामुळे नागपूरच्या ‘वज्रमुठ’ रॅलीत अजितदादा किती सक्रिय दिसतात हे पाहावे लागेल. तसेच या रॅलीच्या माध्यमातून अजित पवार यांच्या या कृतीचा मुद्दाही गाजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.