मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन गट तयार झाले. यापार्श्वभूमीवर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात सत्तासंघर्ष अद्यापही सुरुच आहे. याला अनुसरून शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेच्या 40 आमदारांकडून पुन्हा एकदा मुदतवाढ मागण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता, मात्र आता शिवसेनेच्या आमदारांना आणखी वेळ हवा असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभेच्या अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीसला ज्या आमदारांनी उत्तर दिलं आहे, त्यांच्या उत्तराचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये या सर्व प्रकरणावर चर्चा झाली. मात्र अद्यापही 14 आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणं बाकी आहे. त्यातच पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.