मुंबई : राज्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या पेपर फुटीमुळे मोठा गोंधळ उडाला. पेपरफुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.
पेपरफुटीच्या विषयासंदर्भात धक्कादायक घटना समोर आली आहे. परराज्यातील काही मुलांनी नाशिकमध्ये येऊन अपंग असल्याची बनावट प्रमाणपत्रे काढून परीक्षा दिली आहे. एकीकडे पेपरफुटी तर दुसरीकडे असे बोगस विद्यार्थ्यी परीक्षाचा लाभ घेत आहेत हा प्रकार होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
यात प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तर पालकांचा पैसा बरबाद होत आहे.
नांदेडसह राज्याच्या अनेक भागात हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन पेपर फुटीविरोधात मोर्चे काढले. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे असे म्हणतो मग सरकार काय झोपा काढत होते का ? असा सवाल उपस्थित करत सरकारने यावर उत्तर द्यावे असे पटोले म्हणाले आहेत.