नागपूर :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पक्षनेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यत येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.या चर्चा सुरु असतांना आज त्यांनी संघ मुख्यालय गाठून संघाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे.
या चर्चेवर आता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असून ती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊनही लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर जो कोणी बसेल, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवडता व्यक्ती असेल, असे बोलले जात आहे. मात्र भाजपमध्ये या पदासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा तीव्र झाली असून यावेळी भाजप अध्यक्षाची निवड महाराष्ट्रातून होणार असल्याचे बोलले जात आहे.
त्यासाठी नागपूरपासून दिल्लीपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. फडणवीस यांच्यासोबतच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांच्या नावाचाही अध्यक्षपदासाठी विचार केला जात आहे. मात्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे बोलले जात आहे.