नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरेंचे खासदार नाराज असल्याचं ते म्हणाले.
बावनकुळे यांनी असा दावा केला की, ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते थेट संपर्कात आहेत आणि अनेकांनी फोनद्वारे संवाद साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना जोर आला आहे.
दरम्यान, शिवसेनेने देखील या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पण फक्त बावनकुळेच नव्हे, तर शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनी देखील अशाच प्रकारचं विधान करत ठाकरेंच्या खासदारांमध्ये असलेल्या नाराजीचा उल्लेख केला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंच्या खासदारांना ‘मैत्रीची साद’ घालत आपण अजूनही एकत्र येऊ शकतो, असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्याच्या आगामी राजकारणावर याचा काय परिणाम होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.