नागपूर : कोरोनामुळे दोन वर्षानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शनिवारी (ता. ९) वार्षिक ड्रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्राने १ मिनिटं १० सेकंदात ड्रिल पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच लकडगंज अग्निशमन केंद्र १ मिनिट ११ सेकंदात ड्रिल पूर्ण करून द्वितीय तर सक्करदरा अग्निशमन केंद्र १ मिनिट १२ सेकंदात ड्रिल पूर्ण करून तृतीय स्थान पटकाविला. तर वैयक्तिक शिडी ड्रिल स्पर्धेत बबन जाधव (२६ से.) विजेता ठरला.
यावेळी मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, स्थानक अधिकारी तुषार बाराहाते, सुनील डोकरे, राजेंद्र दुबे, भगवान वाघ आदी उपस्थित होते.
शनिवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी ८ वाजता ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. यात मनपाच्या ९ अग्निशमन केंद्रातील ९ संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघात ६ सदस्य होते. सामूहिक इव्हेंट मध्ये अग्निशमन दलाच्या वाहनातून शिडी उतरविणे, शिडीचे पिचिंग, पंप सुरू करून वॉटर जेटला लक्ष करणे, दोन होज लाईन टाकणे, त्याच वेळी शिडीवर चढणे, दोरीच्या साहाय्याने गुंडाळलेले होज वर खेचणे, डमी अपघातग्रस्त व्यक्तीला स्ट्रेचरवर खेचणे आशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यात आल्या.
वैयक्तिक ड्रिल स्पर्धेत सुरेश आत्राम (२९ से.) आणि राजू पवार (३० से.)यांनी द्वितीय तर प्रवीण गिरी (३०सें) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यात ३० अग्निशमन दलाच्या जवानांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून निवृत्त अग्निशमन अधिकारी श्री. डी. जी. निंबाळकर, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे निवृत्त प्रशिक्षक श्री. मोहन गुडधे, श्री कात्रे उपस्थित होते. यावेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि जवनांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. १४ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाईल.