नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या खासदारांचे निलंबन झाले, त्याचा परिणाम नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाला. आज नागपुरात आमदारांनी निलंबनाच्या निषेधार्थ हातात काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली. विरोधी आमदारांनी आधी हातात काळ्या पट्ट्या बांधून सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली .नंतर ते सभागृहात पोहोचले.
ज्या पद्धतीने निलंबन करण्यात आले ते चुकीचे असून लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असल्याचे आमदारांनी स्पष्टपणे सांगितले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
कथितरित्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी लोकसभेतून आणखी ४९ खासदारांचे निलंबन केल्यामुळे दोन्ही सभागृहातील एकूण निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. मंगळवारी निलंबित केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, मनिष तिवारी आणि कार्ती चिदंबरम अशा नेत्यांचा सहभाग आहे.