नागपूर: नागपुरातील महिलांसोबतच विदर्भातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन जानेवारी २०१८ मध्ये करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजनाच्या सहकार्यासाठी आणि निधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाला पत्र देण्यात येणार असल्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत आज (ता. ३१ ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे होत्या. यावेळी प्रामुख्याने उपसभापती श्रद्धा पाठक, तारा (लक्ष्मी) यादव, दिव्या धुरडे, परिणिता फुके, वंदना भगत, साक्षी राऊत, वैशाली नारनवरे यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.
शहराच्या ह्दयस्थळी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्याचा समितीचा मानस असून यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेळाव्यात महिलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन व्हावे यासाठी आवश्यक पूर्व तयारीबद्दलचा आढावा बैठकीत घेण्यात आला.