नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन विदर्भस्तरीय करण्यात येईल, असा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २७) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला समितीच्या सदस्य दिव्या धुरडे, परिणिता फुके, वंदना भगत, वैशाली नारनवरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, ऑल इंडिया इंस्टिट्युटचे श्री. बोरीकर उपस्थित होते.
महिला उद्योजिका मेळाव्यासंदर्भात चर्चा करताना यंदा विदर्भातील दुर्गम भागातील महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा विषय चर्चेला आला. उद्योजिका मेळाव्याचे आयोजन विदर्भस्तरावर केल्यास गडचिरोली, गोंदिया, मेळघाटसारख्या आदिवासी भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू विक्रीकरिता उपलब्ध राहतील. निरनिराळे उत्पादने यामुळे नागपूरकरांना बघायला मिळतील, असा चर्चेचा सूर होता. यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. लवकरच मेळाव्याचे स्थान निश्चित करण्यात येईल, अशी माहिती सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
अन्य विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. डिसेंबर महिन्यातील पहिला आठवड्यात सर्वपक्षीय नगरसेविकांसाठी तेलंगाणा राज्यात अभ्यास दौऱ्याचे आयोजन ऑल इंडिया इंस्टिट्युटच्या वतीने करण्यात आले आहे. ऑल इंडिया इंस्टिट्युटचे श्री. बोरीकर यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली. नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने उमेट-नागपूर वर्धिनी विक्री केंद्र लक्ष्मीभुवन चौकातील मधुमाधव टॉवर येथे सुरू करण्यात आले आहे.
या विक्री केंद्रात स्वयंसहायता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबतची माहिती समाजकल्याण विभागाचे विनय त्रिकोलवार यांनी दिली. या केंद्राचा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दौरा करतील, असे सभापती वर्षा ठाकरे यांनी सांगितले. जीवन तरुण विमा योजनेसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला समाजकल्याण विभागाचे विनय त्रिकोलवार, नूतन मोरे, विकास बागडे, शारदा गडकर उपस्थित होते.