कोराडी: महिलांवर घरच्या व कार्यालयीन अश्या दुहेरी कामांचा भार असल्याने धावपळ, दगदग, ताणतणाव इत्यादींमुळे सातत्याने आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत असतात मात्र अनेकदा वैद्यकीय तपासणी करण्यास चालढकल होत असल्याने रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. नेमके, या उद्देशाने महानिर्मितीच्या कोराडी येथील मुख्य अभियंता(बांधकाम), (प्रकल्प) आणि (स्थापत्य) कार्यालय कोराडी आणि स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत देवतारे मुख्य अभियंता(स्थापत्य) तर मंचावर विनोद कारगावकर उप मुख्य अभियंता(प्रकल्प), प्रभारी मुख्य अभियंता अरुण पेटकर, सविता झरारीया महाव्यवस्थापक(वित्त व लेखा), डॉ.संगीता बोधलकर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक तसेच स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोराडीचे तज्ज्ञ वैद्यकीय चमू त्यामध्ये डॉ.सीमा जोशी, डॉ.प्रदीप जोशी, डॉ. संजय भाजीपाले प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य तपासणीमध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तगट, रक्तसाखर, महिला आरोग्यविषयक शंका निरसन व औषधोपचार याबाबत सदर शिबिरात तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बांधकाम, प्रकल्प आणि स्थापत्य कार्यालयातील ७५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
याप्रसंगी अनंत देवतारे, सविता झरारीया, डॉ.संगीता बोधलकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. सीमा जोशी यांनी स्त्रियांच्या आरोग्यविषयक दैनंदिन तक्रारींवर उपयुक्त माहिती दिली. यानंतर, डॉ. प्रदीप जोशी यांनी आहार व व्यायाम इत्यादीवर प्रकाश टाकला तर डॉ. संजय भाजीपाले यांनी अस्थिरोग व त्याची विविध कारणे उदाहरणासह सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन हीना खय्याम यांनी केले. बांधकाम कार्यालय कोराडी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत काटदरे,किरण नानवटकर, मंगला गौरकार, सोनिया खोब्रागडे, स्मिता पोकळे, पल्लवी मानवटकर इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.