नागपूर : प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, परिसरात स्वच्छता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याच समस्या घेउनही नागरिक शासन दरबारी आपली कैफीयत मांडतात. वरवरून छोट्या वाटणा-या या समस्या सर्वसामान्य नागरिकांसाठी रोजच्या जगण्याचा संघर्ष आहेत. शासन प्रत्येक समस्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास तयार आहे. मात्र यासाठी प्रशासनाने आपली उदासीनता झटकण्याची गरज आहे. नागरिकांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली असून प्रत्येक काम जबाबदारीने करा व नागरिकांच्या प्रत्येक लहानात लहान समस्यांना प्राधाने देउन ती तातडीने सोडविली जाईल यासाठी काम करा, असा सूचक इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिका-यांना दिला.
नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याच नियोजनांतर्गत सोमवारी (ता. २४) सतरंजीपुरा झोनमध्ये ‘जनसंवाद’ केला. यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, डॉ. मिलींद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अभिजीत बांगर, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, परिवहन समिती उपसभापती प्रवीण भिसीकर, नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणे, संजय चावरे, महेश महाजन, नगरसेविका अभिरूची राजगिरे, शकुंतला पारवे, आभा पांडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख व विविध शासकीय कार्यालय, तसेच ओसीडब्ल्यू, एसएनडीएलचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सतरंजीपुरा झोनमधून १५४ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. या सर्व तक्रारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐकून घेतल्या. त्यातील ज्या तक्रारींवर कार्यवाही झालेली आहे त्यावर तक्रारकर्ता समाधानी आहे की नाही, असे तक्रारकर्त्यांना विचारले. ज्या तक्रारींवर तक्रारकर्ता समाधानी नाही, त्यावर संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारत किती दिवसात तक्रारकर्त्याचे समाधान होईल, त्याचा अवधी विचारत त्या अवधीत समाधान न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला.
नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी निधीची आवश्यकता असल्यास तात्काळ सांगा, शासनाकडून तो ताबडतोब उपलब्ध करून देण्यात येईल. सतरंजीपुरा झोनमध्ये पाणी, गडर लाईनची समस्या सर्वत्र प्रामुख्याने दिसून येते. उन्हाळ्यात याची झळ जास्तच बसणार आहे. हे ओळखून आतापासून संपूर्ण विहीरींची स्वच्छता करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी बोअरवेल निर्माण करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
जनसंवाद कार्यक्रमात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासंदर्भातील काही अर्ज होते. त्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की शासनाने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार यातील अडचण पूर्णपणे दूर झाली आहे. त्यामुळे नियम व अटीनुसार जे मालकी पट्ट्याचे हकदार आहेत, त्यांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील, असे ते म्हणाले. बेघरांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काचे घर मिळेल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी सतरंजीपुरा झोनच्या सभापती यशश्री नंदनवार यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत केले. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
आयुष्यमान योजना, सर्वांना अन्न योजनेसाठी नगरसेवकांनी पुढे या
गरीब लोकांसाठी शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या आयुष्यमान योजनेद्वारे नागरिकांचा विमा काढण्यात येत आहे. या द्वारे कॅन्सर, किडनी, यकृत, हृदयाशी संबंधित आजारावर उपचाराचा पाच लाख रुपयांचा विमा काढला जात आहे. त्यामुळे योग्य उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचणार आहेत. याशिवाय सर्वांना नेहमी अन्न मिळावे यासाठी सर्वांना अन्न पुरवठा या योजनेद्वारे ऑनलाईन प्रक्रिया केली जाणार आहे. या योजनेद्वारे केशरी शिधापत्रिका धारकांना आरसीआयडी क्रमांक ऑनलाईन करावे लागणार आहे. या दोन्ही योजनांचा नागरिकांना पुरेपुर लाभ मिळावा यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना भेटून विमा काढणे तसेच प्रभागातील रेशन दुकानांमध्ये जावून ऑनलाईन करण्यासाठी शिबिर घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.