नागपूर: केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत विदेश व्यापार संचालनालय (डी.जी.एफ.टी.) यांच्या सिवील लाइन्स स्थित नागपूर येथील कार्यालयातर्फे व्ही.सी.ए. ग्राऊंड कॉम्प्लेक्स जवळील हॉटेल हेरिटेज येथे निर्यात बंधु योजने अंतर्गत मुक्त व्यापार करारासंदर्भात (एफ.टी.ए.) एका कार्यशाळेचे आयोजन 12 डिसेंबर 2017 मंगळवार रोजी दुपारी 2 ते 5 दरम्यान करण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे संचालक श्री. ए. बीपीन मेनन, भारतीय व्यापार सेवा (आय.टी.एस.) याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
विदर्भातील व्यापारी समुदायाला मुक्त व्यापार कराराबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि भारत सरकारद्वारे स्वाक्षरी केलेल्या विविध मुक्त व्यापार करार आणि सामंजस्य करारासंबंधात व निर्यात क्षेत्राला उद्भवणा-या समस्यांची चर्चा करणे, हा सदर कार्यशाळेचा उद्देश असणार आहे. मुक्त व्यापार कराराच्या विविध पैलूंवर श्री. ए. बिपीन मेनन या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.व्यापक आर्थिक सहकार करार (सी.ई.सी.ए), व्यापक आर्थिक भागीदारी करार (सी.ई.पी.ए), एम.एफ.एन दरपत्रक, अँटी डंपिंग आणि सुरक्षा उपाय यासारख्या विदेश व्यापारविषयक बाबींचे स्पष्टीकरणही त्यांच्याकडून केले जाईल. सेनेटरी अँड फॅटो सॅनिटरी (एस.पी.एस) उपाय आणि व्यापारासाठी तांत्रिक अडथळे (टी.बी.टी.) यांसारख्या व्यापारसंबंधित क्लिष्ट संकल्पना स्पष्ट
करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागतील अशा समस्यांची डीजीएफटी, नागपूरचे सहायक महासंचालक श्री. अनुपम कुमार या कार्यशाळेदरम्यान माहिती देतील. आयात -निर्यात संधी, बाजारांमध्ये प्रवेश करून व्यवसाय वाढ, संयुक्त उद्यम संधी, विविध देशांमध्ये बाजार प्रवेश, देशांतील भागीदारांसह ब्रँड तयार करण्याबद्दल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून विदर्भातील व्यापारिक समुदायाला मिळणार आहे.
या कार्यशाळेत प्रमुख एफटीए (आसियान, कोरिया आणि जपान) आणि इतर एफ.टी.ए. वाटाघाटींवरील सादरीकरण, एफटीए मार्केटमध्ये सहभागीय अनुभव, एफ.टी.ए.वरील एफ.ए.क्यू. (वारंवार विचारले जाणारे प्रश्न), आणि व्यापार पोर्टल संबंधी माहिती प्रसार या उपक्रमांचा समावेश असेल.