नागपूर: पुढील आर्थिक वर्षांपासून महावितरणच्या उच्च दाब वीज ग्राहकांसाठी लागू होणाऱ्या केव्हीएच बिलिंग पद्धितीची माहिती देण्यासाठी बुटीबोरी येथे उच्चदाब वीज ग्राहकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
बुटीबोरी येथील औदयोगिक संघटनेने केव्हीएच बिलिंग पद्धत जाणून घेण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार पुढील वर्षी एप्रिल २०२० पासून उच्च दाब वीज ग्राहकांसाठी केव्हीएएच बिलिंग प्रणाली लागू करण्यात येणार आहे. नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी उपस्थित वीज ग्राहकांना मार्गदर्शन केले.
उच्चदाब वीज ग्राहकांना लागू होणाऱ्या नवीन पद्धतीची माहिती देऊन वीज ग्राहकांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे दिली. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार २० किलोवॅट वरील जोडभार असलेल्या वीज ग्राहकांसाठी पुढील वर्षी एप्रिल २०२० पासून वरील पद्धतीने वीज देयकाची आकारणी करण्यात येणार आहे. या अगोदर उच्च दाब वीज ग्राहकाना केडब्लूएच पद्धतीने वीज देयकाची आकारणी करण्यात येत होती.
नवीन पद्धतीने देयकाची आकारणी केल्याने वीज यंत्रणेवरील असणारा भर हलका होण्यास मदत होणार असून उच्च दाब वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे. सोबतच रोहित्रावरील ताण कमी होणार होणार आहे. अशी माहिती अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी यावेळी दिली. कार्यक्रमात महावितरण बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ यांनी बुटीबोरी विभागात सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. व्यासपीठावर मिलिंद कानडे, नितीन लोणकर यांच्यासह बुटीबोरी येथील औदयोगिक ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.