मुंबई : १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यापार्श्वभूमीवर देश-विदेशातून अहमदाबादेत आजपासूनच क्रिकेट प्रेमींची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यासाठी साधी रूम २० हजार रुपयांपासूनच तर लाखांच्या घरात पोहोचले आहे. तर विमानतिकीट ९ हजारांवर गेले आहे.केवळ अहमदाबादच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील हॉटेलांचे दर गगनाला भिडले असून विमानांच्या तिकिटांमध्येही तीन ते पाचपट वाढ झाली आहे.
सामन्याच्या दिवशी, म्हणजे रविवारी एका रात्रीसाठी पंचतारांकित हॉटेलांचे एका खोलीचे दर दोन लाखांच्या घरात पोहोचले आहेत. साध्यासुधे लॉज, हॉटेलांनीही आपल्या दरांत पाच ते सात पट वाढ करण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी २००३ साली ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम फेरीत पराभूत केले होते. २० वर्षांनंतर टीम इंडियाचा पुन्हा एकदा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे, अशा परिस्थितीत टीम इंडियालाही विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.