नागपूर: विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे.भारत संघाने हा सामना जिंकल्याने देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत असून या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
इतकेच नाही तर नागपुरातही क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. फटाक्यांची आतषबाजी करत तसेच नाचत- गाजत हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी विजयाचा आनंद साजरा केला.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या आहेत. शमीने एकट्याने संपूर्ण किवी संघ उद्ध्वस्त केला आहे. आता भारताचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने 7 विकेट घेत विक्रमांची मालिका आपल्या नावावर केली आहे.
तत्पूर्वी, भारताने विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांच्या जोरावर 397 धावांचा डोंगर रचला. कोहलीने यावेळी आपले 50वे वनडे शतक साजरे करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. कोहलीने यावेळी सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडीत काढला.