मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री आणि विचारवंत नेते डॉ. श्रीकांत जिचकर यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकर यांनी गुरुवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील तिलक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला.
काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याज्ञवल्क्य जिचकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीऐवजी अपक्ष म्हणून काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले होते. मात्र, आता पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे.
सध्या याज्ञवल्क्य जिचकर हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुनरागमनामुळे काँग्रेसच्या युवक गटाला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पक्षप्रवेशानंतर जिचकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “काँग्रेस हीच माझी मूलभूत विचारसरणी आहे. काही कारणांमुळे वेगळा मार्ग निवडावा लागला होता, पण आता मी पुन्हा पूर्ण क्षमतेने पक्षासाठी झटणार आहे.”
राजकीय वर्तुळात या घडामोडीकडे महत्त्वपूर्ण पावले म्हणून पाहिले जात असून आगामी काळात विदर्भात काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.