नागपूर– राज्याच्या उपराजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे अमरावती येथील व्यापारी महावीर कोठारी यांच्या अपहरणाचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. ही घटना रामदासपेठ येथील जैन मंदिराच्या मागील परिसरात घडली.
प्राथमिक माहितीनुसार, महावीर कोठारी यांनी सलमान खान या आरोपीकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या आर्थिक देवाणघेवाणीमुळेच अपहरणाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. सलमान खान आणि अझर पठाण या दोघांनी मिळून हा कट आखला होता.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी राहुल मदने यांनी तात्काळ पथकाला सक्रिय केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे वाडी परिसरातून सलमान खानला अटक करण्यात आली. मात्र अझर पठाण आणि त्याची महिला सहकारी पिंकी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर कोठारी यांनी अमरावतीतही अनेक व्यक्तींकडून पैसे घेतल्याची माहिती आहे.यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे.
सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. पोलिसांनी अपहरणाच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरु आहे.
पोलिसांचा अंदाज आहे की वेळेवर कारवाई झाली नसती, तर हे प्रकरण खुनापर्यंत जाऊ शकले असते.
प्रकरण अजूनही तपासाधीन असून अझर पठाण आणि पिंकी यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.