नागपूर : प्रियकराने दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविल्याचे समजल्याने एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला प्रियकराची दगाबाजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सम्यक मेश्राम (वय २०) असे आरोपी प्रियकराचे नाव असून, त्याच्या दगाबाजीमुळे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव अश्विनी ऊर्फ मोनिका काशीनाथ बोरीकर (वय २०) आहे.
धंतोलीच्या राहुल नगरात राहणारी अश्विनी ऊर्फ मोनिका बोरीकर हिने २९ मार्चला दुपारी २.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी मोनिकाच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली असता तिचे गेल्या काही महिन्यांपासून भिलगाव, कामठी येथील आरोपी सम्यक मेश्राम सोबत प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सम्यकने दुसऱ्या एका युवतीला आपल्या जाळ्यात ओढले. सम्यकने आपल्याला अंधारात ठेवून दुसऱ्या युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू केल्याचे कळल्याने मोनिका कमालीची दुखावली होती. तिने त्याला त्या युवतीसोबत बोलण्यास मनाई केली होती. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी सम्यकने तिला उलटसुलट बोलून तिचे मन दुखवले.
एवढेच नव्हे तर तिच्या मोबाईलवर व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून नको तसे मेसेज पाठवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्याचमुळे मोनिकाने गळफास लावून स्वत:ला संपविल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले. परिणामी मोनिकाचा भाऊ तुषार काशीनाथ बोरीकर (वय २३) याची तक्रार नोंदवून घेत धंतोली पोलिसांनी आरोपी सम्यक मेश्रामविरुद्ध कलम ३०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.