नागपूर :शहरातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत नंदनवन पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई करत एम.डी. पावडर बाळगणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५.११ ग्रॅम एम.डी. पावडरसह मोबाईल फोन असा एकूण ३५,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (१९ एप्रिल) पहाटे ५.१० ते ६.३० या वेळेत करण्यात आली. नंदनवन परिसरातील हसनबाग भागात, दानिश लॉन्सजवळ एक तरुण एम.डी. पावडरसोबत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, तपास पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना पाहून संबंधित तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, त्याची ओळख सोहेल शेख शकील अहमद (वय २५, रा. चांदणी चौक, हसनबाग, नंदनवन, नागपूर) अशी पटली. त्याच्याकडून ५.११ ग्रॅम एम.डी. पावडर व मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, याची किंमत सुमारे ३५,५५० रुपये इतकी आहे.
प्राथमिक तपासात आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडरची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अंतर्गत कलम ८ (क) व २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह आयुक्त निसार तांबोळी, अपर आयुक्त शिवाजीराव राठोड, उप आयुक्त रश्मिता राव आणि सह आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. विनायक कोळी, पोउपनि. प्रविण राऊत, पोहवा. दिनेश जुगनाके, विलास चौधरी, पोअं. प्रविण मरापे, रामदास हरण, तसेच मपोअं. आरती शुक्ला यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
नंदनवन पोलिसांच्या या वेळीच्या तडाखेबंद कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शहरातील अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.