नागपूर – शहरातील प्रतिष्ठित परिसरांपैकी एक असलेल्या धरमपेठमध्ये पुन्हा एकदा काही युवकांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास काही युवकांनी गाडीतून येत रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवत नाचण्यास सुरुवात केली आणि अंगावरील शर्ट काढून रस्त्यावरच आरडाओरड करू लागले. ही घटना स्थानिक नागरिकांच्या त्रासाचा कारण बनली असून, नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
युवकांच्या या धिंगाण्याचा व्हिडिओ काहींनी काढून सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, युवक बेधडकपणे गाडी चालवत होते, जोरात हॉर्न वाजवत होते आणि शर्ट काढून गोंधळ करत होते.
धरमपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर लाउंज आणि डिस्को असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहने आणि लोकांची गर्दी असते. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पब व लाउंजमुळे रस्त्यावर मद्यधुंद व्यक्ती गोंधळ घालत असून, यापूर्वीही काही गुन्हेगारी घटना येथे घडल्या आहेत.
नागरिकांनी याबाबत अनेकदा पोलीस आणि मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असली, तरीही अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांनी पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.